
संजय राऊत यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयाची स्थगिती!
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात मोठा दिलासा दिला. दंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना सुनावलेल्या शिक्षेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी स्थगिती दिली. तसेच 50 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीनही मंजूर केला.दंडाधिकारी न्यायालयाने गेल्या महिन्यात संजय राऊत यांना 15 दिवसांचा साधा तुरुंगवास व दंड ठोठावला होता. त्या शिक्षेविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे. या अपिलावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी संजय राऊत यांच्यातर्फे ॲड. मनोज पिंगळे यांनी युक्तिवाद केला आणि शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली. त्यावर मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत विरोध केला. तथापि, न्यायालयाने सोमय्यांचा विरोध धुडकावला आणि संजय राऊत यांच्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला. तसेच अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेत पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 रोजी निश्चित केली. संजय राऊत यांना यापुढे खटल्यात गैरहजर राहण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे.*सोमय्यांना फटकारले*सोमय्यांच्या वकिलांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करताच न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले. दाखल केलेले अपील हे शिक्षा रद्द करण्यासाठीच आहे. कायद्यातही हीच व्याख्या आहे. तुमचा मुद्दा गौण आहे, अशा शब्दांत न्यायालयाने सोमय्यांची कानउघाडणी केली.*नेमके प्रकरण काय?*मीरा-भाईंदरमध्ये एमएमआरडीच्या फंडातून सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली होती. 154 सार्वजनिक शौचालयांपैकी 16 शौचालयांचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आले होते. हे कंत्राट बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचा व कंत्राटात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करत केला होता. तेव्हा पर्यावरण मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शौचालये बांधकामातील 3 कोटी 90 लाख रुपयांच्या घोटाळय़ाचे वृत्त दै. ‘सामना’ने एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यामुळे बदनामी झाल्याचा दावा मेधा सोमय्या यांनी केला.*जामीन मंजूर भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेत; त्याचा खटल्यात नक्कीच पुनर्विचार होईल – संजय राऊत*न्यायालयीन लढाई आम्हाला नवीन नाही. जनतेच्या हितासाठी आम्ही विधाने केली असतील, त्यावर कुणी अब्रुनुकसानीचा दावा करीत असेल तर त्यांचा हेतू बरोबर नाही. खालच्या कोर्टाने शिक्षा ठोठावली, त्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात गेलो. हा खटला नव्याने चालवला जाईल, त्यावेळी भ्रष्टाचारासंदर्भात आम्ही मांडलेले मुद्दे तसेच पुराव्यांचा नक्कीच पुनर्विचार होईल. खालच्या कोर्टाने आम्ही दिलेले पुरावे ग्राह्य का धरले नाहीत हा एक प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी शिवसेना आमदार सुनील राऊत, माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्यासह शिवसैनिक हजर होते.