इथेनॉलसह जैविक इंधननिर्मितीवर भर द्या : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्र सरकारने देशाला लागणार्या इंधनांची आयात कमी करण्यास प्राधान्य दिले असून, जैविक इंधनाच्या उत्पादनवाढीवर भर देण्यासाठी प्रोत्साहनही दिले जात आहे. त्यासाठी साखर आणि कृषी उद्योगाने लक्ष केंद्रित करायला हवे.
ग्रीन हायड्रोजनसारखे जैविक इंधन ही आता काळाची गरज बनली असून, भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच इथेनॉलसह जैविक इंधननिर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि.12) केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मांजरीतील मुख्यालय आवारात आयोजित तिसर्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्हीएसआय संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन शुक्रवारी (दि.12) सकाळी झाले.
या वेळी गडकरी यांच्या हस्ते साखर उद्योगाच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. या वेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार अशोक पवार, इंद्रजित मोहिते, प्रशांत परिचारक, व्हीएसआयचे सल्लागार शिवाजीराव देशमुख व महासंचालक संभाजी कडू पाटील आदी उपस्थित होते. जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी, या विषयावरील या परिषदेला 27 देशांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. या वेळी गडकरी यांनी साखर उद्योगासंदर्भातील प्रदर्शनाचे उद्घाटन करत विविध स्टॉल्सना भेटी देऊन पाहणी केली.
साखर उद्योगाने जास्तीत जास्त साखर उत्पादन करून फ्लेक्स इंजिन वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. इथेनॉल उत्पादनासाठी उसाच्या वापरावरील निर्बंधाची बाब ही तात्पुरती गोष्ट असून, त्याप्रश्नी सरकार योग्य ती पावले उचलेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य मंत्र्यांसोबत मी यापूर्वीच चर्चा केली आहे. त्यामुळे काळजी करू नका, एप्रिलनंतर आपण साखर उद्योगाच्या समस्यांवर निश्चित मार्ग काढू, असे आश्वासन देत गडकरी म्हणाले, ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त जैविक इंधन म्हणून ओळखले जात असून, पेट्रोल-डिझेलसारख्या पारंपरिक इंधनाला ते योग्य पर्याय म्हणून पुढे आले आहे. व्हीएसआय संस्थेचे साखर उद्योगाला नवनवीन संशोधन पुरविण्यात मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
ऊसगाळप हंगाम कालावधी कमी झाल्याने अडचण : शरद पवार
सकाळच्या सत्रात बोलताना व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, साखर कारखान्यांनी त्यांच्या दैनिक ऊसगाळपाच्या क्षमतेत वाढ केली आहे. त्यामुळे ऊसगाळप हंगामाचा कालावधी 160 दिवसांवरून कमी होत 120 दिवसांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे संपूर्ण साखर कारखान्यांची यंत्रणा, मनुष्यबळ इतरवेळी निष्क्रिय राहते. त्यामुळे उत्पादन व इतर खर्चात वाढ होते. त्यामुळे बदलत्या काळानुसार साखर कारखान्यांनी इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी), हायड्रोजन सारख्या इंधनाची निर्मिती करून विविध उत्पादने तयार करण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
www.konkantoday.com