अटल सेतूचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, पण प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार माहिती आहे? वाचा दरपत्रक.


मुंबईकरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आणि बहुप्रतिक्षित असणाऱ्या अटल सेतूचं अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उदघाटन झालं. मुंबई महानगराचा कायापालट करणारा हा प्रकल्प असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी हा मार्ग मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरणार असून अवघ्या २० ते २२ मिनिटांमध्ये हे अंतर पार करता येणार आहे.

कसा आहे अटल सेतू?

अटल सेतूची लांबी २१.८० किलोमीट इतकी आहे. या सहा पदरी मार्गाचा १६.५ किलोमीटरचा भाग सागरी सेतूनं व्यापला आहे, तर ५.५ किलोमीटरचा भग जमिनीवर आहे. या मार्गासाठीचा एकूण खर्च १८ हजार कोटी इतका अपेक्षित होता. मात्र, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याचा एकूण खर्च २१ हजार कोटीच्यावर गेला. या सेतूच्या बांधकामासाठी १ लाख ६५ हजार टन स्टील, ९६ हजार २५० टन स्ट्रक्चरल स्टील, ८ लाख ३० हजार क्यूबिक मीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे.

अटल सेतूसाठी नेमका किती टोल भरावा लागणार?

अटल सेतूवर नेमका कोणत्या वाहनांना किती टोल भरावा लागणार आहे, याविषयी माहिती समोर आली असून त्यानुसार प्रत्येक वाहनासठी एकेरी, दोन्ही बाजूंनी, दैनंदिन आणि मासिक पास अशा स्वरूपाचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

कार/चारचाकी – चारचाकी वाहनांच्या एकेरी वाहतुकीसाठी अटल सेतूवर एका बाजूना वाहतुकीसाठी २५० तर दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी ३७५ रुपये इतका टोल आकारण्यात येईल. दैनंदिन पाससाठी ६२५ तर मासिक पाससाठी १२ हजार ५०० रुपये असा दर आकारण्यात येणार आहे.

मिनीबस – छोट्या बसेससाठी एका बाजूने ४०० तर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी ६०० रुपये टोल आकारला जाईल. दैनंदिन पाससाठी १ हजार तर मासिक पाससाठी २० हजार रुपये इतका दर आकारला जाईल.

छोटे ट्रक/वाहने (२ एक्सेल) – छोट्या ट्रकसाठी एका बाजूच्या वाहतुकीसाठी ८३० तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १२४५ रुपये इतका टोल आकारला जाईल. त्यात दैनंदिन पाससाठी २०७५ तर मासिक पाससाठी ४१ हजार ५०० रुपये इतका दर आकारला जाणार आहे.

एमएव्ही (३ एक्सेल) – या प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीला ९०५ रुपये तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १३६० रुपये इतका टोल भरावा लागेल. दैनंदिन पाससाठी २२६५ तर मासिक पाससाठी ४५ हजार २५० रुपये इतका दर आकारला जाईल.

मोठे ट्रक/वाहने (४-६ एक्सेल) – या प्रकारच्या वाहनांना एका बाजूने १३०० रुपये तर दोन्ही बाजूंसाठी १९५० रुपये इतका टोल भरावा लागेल. तर दैनंदिन पाससाठी ३२५० रुपये आणि मासिक पाससाठी ६५ हजार रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे.

अवजड वाहने – या श्रेणीतील वाहनांसाठी अटल सेतूवर एका बाजूने १८५० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंसाठी हाच दर २३७० इतका आहे. या वाहनांना दैनंदिन पास हवा असल्यास त्यासाठी ३९५० रुपये मोजावे लागणार आहेत. मासिक पाससाठी या वाहनांना ७९ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

यासंदर्भात उभारण्यात आलेल्या फलकावरील माहितीनुसार, हे दर ३१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी लागू असतील.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button