
शहर स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र नंबर १., या शहराने पटकवला पहिला क्रमांक
केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर केला. यात एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेले सासवड शहर देशातली सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेले आहे. तर एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राची नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर. भोपाळ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचले आहे.
एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातील लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम, मध्य प्रदेशने द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. गेल्यावेळी मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होते. गंगेच्या काठावर वसलेल्या स्वच्छ शहरांमध्ये वाराणसी पहिल्या तर प्रयागराज दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. ‘महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदानातून, आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे. स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हीरो असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप पुरी यांनी या राज्यांच्या प्रतिनिधींचा गौरव केला. यावेळी एकूण 9500 गुणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित शहर पुरस्कार चंदीगड ला देण्यात आला आहे.
सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने ७ स्टार मानांकनासह तिसरा क्रमांक पटकावला आहे. एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये नगर परिषद सासवडला प्रथम आणि लोणावळा शहराला तृतीय क्रमांक मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेला ५ स्टार मानांकन आणि पिंपरी चिंचवडला ५ स्टार मानांकनासह वॉटरप्लस मानांकन मिळाले आहे. याशिवाय एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सासवड, लोणावळ्यासह, कराड, पाचगणी व विटा यांनी स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावले आहेत. तर गडहिंग्लज, विटा, देवळाली आणि सिल्लोड या शहरांनी मानांकनात स्थान मिळवले आहे. यामुळे देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ८ शहरांनी स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
www.konkantoday.com