मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न,२६ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार
भाट्ये खाडीच्या मुखाजवळील मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न गेली २० ते २५ वर्षे भिजत घोंगडे आहे. हा गाळ साचल्याने समुद्रातून खाडीत ये-जा करण्यासाठी मच्छीमारांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते. गाळ काढण्यासाठी जमातूल मुस्लिमिन राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने मच्छीमार २६ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या भागात अनेकदा अपघात घडून काही मच्छीमारांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मच्छीमारांची गाळ उपसण्याची प्रमुख मागणी आहे. हा गाळ उपसण्याबाबत अनेकदा आश्वासने देण्यात आली; मात्र त्याची पूर्तता न झाल्यामुळे मच्छीमारामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भाट्ये खाडी परिसरातील राजीवडा, भाट्ये, कर्ला, फणसोप आदी गावांतील रहिवाशांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. येथील मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात ये-जा करण्यासाठी मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. या बंदरात वाळू साचल्याने मच्छीमारांना हा मार्ग धोकादायक झाला आहे. त्यामुळे अनेकदा नौकांना अपघात घडल्यामुळे मच्छीमार बुडून मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत.
www.konkantoday.com