काऊंट डाऊन सुरू! १६ आमदार अपात्रप्रकरणाचा कौल कोणाच्या बाजूने लागणार? नार्वेकरांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष!
गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याबाबत १० जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण निकाल येण्याची शक्यता आहे. या निकालामुळे या सत्तानाट्यावर पडदा पडणार की सत्तानाट्यात मध्यांतर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दोनदा फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे.
२० जून २०२२ रोजी राज्यात अभूतपूर्व राजकीय घटना घडली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करून काही आमदारांना आपल्या बाजूने वळवून घेतलं. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. ठाकरे गटाने एकनाथ शिंदे, भरत गोगावलेंसह १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली. ठाकरे गटाच्या या मागणीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून निवडणूक आयोगात, निवडणूक आयोगाकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आणि मग आता विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मे महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता. परंतु, या सुनावणीत दिरंगाई करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला गेला. सुनावणीला उशिराने सुरुवात होणे आणि अखंडित सुनावणी न होणे यावरून ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे न्यायालायने मर्यादित कालावधीत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. परंतु, ३१ जानेवारीची डेडलाईन हुकली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. यानुसार, दहा दिवसांचा अवधी वाढवून देऊन १० जानेवारी रोजी सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, बुधवार, १० जानेवारी रोजी निकाल येण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी (७ जानेवारी) राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून विरोधकांना टीका केली. आमदार अपात्र प्रकरणाविषयी चर्चा करण्याकरता ही भेट घेतली असल्याचं विरोधकांनी म्हटलं. राहुल नार्वेकर सध्या न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे त्यांनी याप्रकरणात आरोपी असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेणं बेकायदा असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. ज्येष्ठ वकिल उल्हास बापट यांनीही अशाच शब्दांत टीका केली. तर शरद पवारांसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनीही या भेटीवरून निशाणा साधला.
नार्वेकर आणि शिंदे भेटीवरून राजकारण वाढू लागल्यानंतर राहुल नार्वेकर यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. ही भेट राज्यातील आणि मतदारसंघातील समस्यांसाठी घेण्यात आल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.
दोन्ही बाजूच्या पक्षकांरांनी आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
www.konkantoday.com