
अवकाळी पावसामुळे कीर्तन संध्या महोत्सव एक दिवस उशिरा
रत्नागिरी : नऊ जानेवारी २०२४ रोजी पहाटेअचानक झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे कीर्तनसंध्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता कीर्तनसंध्या महोत्सव एक दिवस उशिरा ११ जानेवारीला (गुरुवार) सुरू होणार आहे.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १४ जानेवारीला, रविवारी त्याचा समारोप होणार आहे. स्थळ, वेळ आणि अन्य कार्यक्रमात काहीही बदल नाही. ऐन वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे कराव्या लागत असलेल्या या बदलाची नोंद सर्वांनी घ्यावी आणि कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराने केले आहे.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येच्या श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे देशभर उत्साहाचे वातावरण असून, २२ जानेवारीला घरोघरी रामज्योत पेटवून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ५००हून अधिक वर्षांच्या संघर्षानंतर श्रीराम मंदिर उभे राहत असल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराने यंदाचा महोत्सव ‘आले रामराज्य अर्थात राममंदिर ते राष्ट्रमंदिर’ या विषयावर आयोजित केला आहे. ११ जानेवारी ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हा महोत्सव होणार आहे. भारतीय बैठक सर्वांसाठी मोफत आहे. याशिवाय खुर्च्यांवरील बैठक व्यवस्थेसाठी सन्मान का उपलब्ध करून दिल्या आहेत
राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांच्या सुश्राव्य आवाजात रामकथा, त्याच्या जोडीला अजरामर संगीत कलाकृती असलेल्या गीत रामायणातील काही निवडक गाणी आणि पाचव्या दिवशी लळिताचे कीर्तन, कथा – गीतरामायण – कीर्तन या त्रिवेणी सगमातून प्रभू श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र महोत्सवात ऐकायला मिळणार आहे. रामकथा सांगत असताना आफळेबुवा श्रीराम मंदिराच्या उभारणीचा संक्षिप्त इतिहासही उलगडून सांगणार आहेत. अयोध्येतील भव्य राममंदिराचा देखावा हे यंदाच्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे. ३२ फूट लांब, २० फूट रुंद आणि १५ फूट उंच अशा भव्य व्यासपीठाच्या मागे सुमारे १२ फूट उंच आणि २४ फूट लांब अशा भव्य आकाराचा राममंदिरचा सुंदर देखावा उभारण्यात येणार आहे. रत्नागिरीतीलच प्रसिद्ध रांगोळीकार, चित्रकार राहुल कळंबटे यांनी साकारला आहे. या देखाव्यात प्रभू श्रीरामांचा आठ फूट उंच पूर्णाकृती कटआउटदेखील असेल.
www.konkantoday.com