
मुंबई-गोवा महामार्गासाठी सरकारकडून आता नवा मुहूर्त, कोकण दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
कोकणात जाणारा मुंबई-गोवा महामार्ग गेले कित्येक वर्षे रखडला आहे. या मार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मध्यंतरी जोरदार आंदोलन केले. या महामार्गाची एक मार्गिका गणपतीपर्यंत सुरू करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु, प्रत्यक्षात ही मार्गिका सुरू होऊ शकली नाही. मात्र, हा मार्ग आता पूर्ण होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते राजापुरातील शिवसंकल्प अभियान कार्यकर्ता मेळव्यात बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर आहेत. कोकण दौऱ्यात त्यांनी कोकणवासियांचं कौतुक केलंय. तसंच, आगामी काळात कोकणवासियांसाठी प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. तर मुंबई-गोवा महामार्गाबाबतही मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकणातील फळबागांसाठी ५ वर्षांसाठी १३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आंबा आणि काजूचा समावेश आहे. तसंच, ही फळं पीकविम्याच्या यादीत नसल्याने येत्या काळात त्याबाबत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल.
तर, गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, हा महामार्ग येत्या वर्षभरात पूर्ण होईल. वर्षभरामध्ये मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. येत्या काळात कोकणातील पर्यटनाला चालना द्यायची आहे. ज्याप्रमाणे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे केला. समृद्धी महामार्ग केला. त्याच धर्तीवर मुंबई गोवा ग्रीनफिल्ड तयार करतोय. सुपर एक्स्प्रेस डीपीआरचं काम सुरू आहे, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
,www.konkantoday.com