
चिपळूण तालुक्यात बेकायदा सावकारीचा आणि खंडणीचा धंदा जोरात
चिपळूण तालुक्यात बेकायदा सावकारीचा आणि खंडणीचा धंदा जोरात फोफावला आहे.कर्जदारांकडून भरमसाट दराने व्याज आकारणी आणि त्यावर दंडव्याजाची रक्कम वसूल करायची. त्यानंतर पुन्हा जादा पैशांची मागणी, पैसे न दिल्यास मारहाण, जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. तालुक्यात तिघांच्या विरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बेकायदा सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात उघडपणे तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे; मात्र अनेकजण भितीपोटी तक्रार देत नसल्याचे चित्र आहे.
एखादी व्यक्ती आर्थिक अडचणींमुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत जाते; परंतु तेथे अर्जासोबत कागदपत्रे, तारण, त्याच बॅंकेतील सभासद असलेली व्यक्तीच जामीनदार हवी यांसह विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याची पूर्तता न केल्यास बॅंक कर्ज देत नाही. व्यक्तीला शेवटी नाइलाजास्तव सावकाराकडे जावे लागते. त्यात पुन्हा बेकायदा सावकारी. हे सावकार कर्जदारांकडून मुद्दल, व्याज, दंडव्याज आकारतात. बऱ्याचदा मुद्दलाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त असते. मुद्दल परत करूनही जादा पैशांसाठी बेकायदा सावकारांकडून कर्जदारांना घरी जाऊन शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार सुरू आहेत. जामीनदारांनाही मानसिक त्रास दिला जात आहे; परंतु अनेकजण भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार देत नाहीत. कर्जदारांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
www.konkantoday.com