शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या हस्ते कोकण कोस्टल मॅरेथॉनचे होणार उद्घाटन
रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण तथा भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीतील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार, संपदा धोपटकर, आरती कांबळे आणि वीर माता श्रीमती ज्योती राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ज्या खेळाडूंनी रत्नागिरीचा झेंडा देशात व राज्यात फडकवला त्या महिला खेळाडूंना फ्लॅग ऑफ चा मान देण्याची आगळीवेगळी कल्पना सत्यात उतरणार आहे.. ७ जानेवारीला सकाळी ६ वाजता थिबा पॅलेस रोडवरील मथुरा हॉटेल येथून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
७ जानेवारीला रत्नागिरी धावनगरी होणार आहे. या स्पर्धेत देशभरातून जवळजवळ १५०० च्या आसपास नोंदणी झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी एवढी मोठी संख्या येणे हे आव्हानात्मक होते. परंतु हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. साधारणपणे २१ किमीसाठी ३५० पेक्षा अधिक, १० किमीसाठी ४५० पेक्षा जास्त आणि ५ किमीसाठी सर्वाधिक म्हणजे ५५० हून अधिक धावदूतांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३५ टक्के खेळाडू हे रत्नागिरीबाहेरील आहेत. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासन पर्यटन महासंचालनालय, बॅंक ऑफ इंडिया, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, ब्रूक्स, एमआर असोशिएशन आदींचे सहकार्य लाभले आहे.
रत्नागिरीकरांना आवाहन
ज्या भागातून ही स्पर्धा होणार आहे त्या मार्गावर धावदूतांना रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून प्रोत्साहन देऊ शकता. धावपटूंच्या स्वागतासाठी ढोल- ताशे वाजवू शकता. हातात बॅनर, बोर्ड घेऊन आपल्या रत्नागिरीत पर्यटनस्थळांचे किती छान आहेत, त्याचे फोटो लावू शकतो. आपापल्या कंपनीचे, संघटनेचे, संस्थेचे, मंडळाचे, ग्रुपचे नावाचे बोर्ड घेवून उभे राहू शकतो. तसेच सकाळी ७.३० वाजल्यापासून भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर सहभागी स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी जरूर या, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी केले आहे.
स्पर्धेचा मार्ग
२१ किमीचा मार्ग- वेळ सकाळी ६.०० वाजता, हॉटेल मथुरा समोरून सुरवात होऊन माळनाका, मारुती मंदीर, नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी, वेसुर्ले, नवा फणसोप, भाट्ये गाव ते भाट्ये समुद्र किनारा. १० किमी- सकाळी ६.१५ वाजता, हॉटेल मथुरा समोरून सुरवात होऊन माळनाका, मारुती मंदीर, नाचणे, शांतीनगर येथून फिरून परत पुन्हा मारुती मंदीर, गोगटे कॉलेज, भाट्ये समुद्रकिनारा. ५ किमी.- वेळ सकाळी ६.५० वाजता, मथुरा समोरून सुरवात होऊन माळनाका, मारुती मंदीर, नाचणे पॉवरहाऊस येथून फिरून परत पुन्हा मारुती मंदीर, गोगटे कॉलेज, भाट्ये समुद्र किनारा. स्पर्धेचे बक्षीस वितरण भाट्ये समुद्रकिनारी होणार आहे.
www.konkantoday.com