रत्नागिरी मधील दोन रत्न ‘कातळशिल्प आणि हापूस आंबा ‘ आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त नाण्यावर ….


जपान देशाच्या जपान मिंट (टांकसाळी) या प्रशासकीय संस्थेतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना 2023’ स्पर्धेत “कोकणातली अश्मयुगीन कातळशिल्प” या विषयावर आधारित नाणे डिझाईन सादर करणारे शिल्पकार प्रा. मुकेश पुरो यांना “फाईन मास्टर आर्टिस्ट” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीला “फाईन आर्ट” म्हणून गौरविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे श्री मुकेश पुरो यांनी कातळशिल्पांची छबी रत्नागिरीची अजून एक खास परिचित ओळख असलेल्या हापूस आंब्याच्या पार्श्र्वभूमीवर साकारली आहे.
आपल्या कलाकृतीतून रत्नागिरी मधील कातळशिल्पाना जागतिक स्तरावर नेणाऱ्या प्रा. श्री मुकेश पूरो यांचे निसर्गयात्री संस्थेच्या वतीने अभिनंदन आणि आभार.

बस रिलीफ ( Bass relief) प्रकारातील 12 सेमी व्यास आणि 1.2 मिमी जाडीच्या या नाण्यावर श्री मुकेश यांनी एका बाजूला रत्नागिरी मधील रूंढेतळी येथील कातळशिल्प रचना साकारलेली असून त्याभोवती कोंकणातील कातळशिल्प, रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया असे अक्षरात तयार केले आहे. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला रत्नागिरी मधील प्रसिद्ध हापूस आंब्याच्या पार्श्वभूमीवर कशेळी येथील कातळशिल्प रचना साकारलेली आहे.

जपान देशाच्या जपान मिंट (टांकसाळी) या प्रशासकीय संस्थेतर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्था आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत जगभरातून विविध देशातील कलाकार सहभागी होतात. या स्पर्धेतून ही संस्था, आपल्या बुध्दी कौशल्य आणि कला तंत्राचा वापर करून उत्थित शिल्प या कला प्रकारात काम करणाऱ्या जगातील कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा गौरव करते. 2023 मध्ये आयोजित स्पर्धेत जगभरातून 250 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकातून पहिल्या 5 जणांची ( इटली, युक्रेन, जपान आणि भारत) निवड करण्यात आली. या पाच जणात भारत देशाचे श्री मुकेश पुरो यांचा समावेश आहे.
(या स्पर्धेत मानांकन मिळालेली नाणी जपान येथील नाणे संग्रहालयात संग्रहित करून कलाकृतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मूल्य ठरविले जाते.)

मुंबई स्थित श्री मुकेश पुरो यांनी सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या जगविख्यात कला संस्थेतून जी. डी. आर्ट (शिल्पकला), कला शिक्षण शास्त्र (पदविका)..प्रथम क्रमांकाने प्राप्त केली आहे. तसेच शासकीय फेलोशिप मान देखील प्राप्त केला आहे.
सध्या ते कला महाविद्यालय, गिरगाव, मुंबई येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. श्री मुकेश यांना त्यांनी केलेल्या कार्याप्रती ‘द इंडियन आर्ट सोसायटी’….’द बॉम्बे आर्ट सोसायटी’….’द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’
आयफॅकस..( नवी दिल्ली ) अशा विविध मान्यवर संस्थांतर्फे वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जपान मिंट द्वारा आयोजित इंटरनॅशनल कॉइन डिझाईन या स्पर्धेत आपली कला ( डिझाईन) सादर करणाऱ्या स्पर्धकाला सादर करणाऱ्या विषयाची नाविन्यता, त्याचे ऐतिहासिक महत्व , आपल्या देशातील त्याचे विशिष्ठ स्थान ह्या सर्वांची माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी संकल्पना (डिझाईन) सादर केल्यावर स्पर्धकाची मुलाखत घेतली जाते. यातून पार पडल्यावर सादर केलेल्या संकल्पनेवर आधारित संस्थेने दिलेल्या निकषानुसार प्रत्यक्ष नाणे तयार करून सादर करावयाचे असते. या सगळ्या प्रक्रियेतून तावून सलाखून निघाल्यावर संस्था पहिल्या पाच स्पर्धकांची निवड करते. स्पर्धकांचा कस पहाणाऱ्या या जागतिक स्तरावरील स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या आणि आमच्या कामाला आपल्या कलाकृतीतून जागतिक स्तरावर नेणाऱ्या श्री मुकेश पुरो यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

या बहुमूल्य कामात आम्हाला खारीचा वाटा उचलायची संधी दिल्याबद्दल श्री मुकेश पुरो यांचे आभार.

सुधीर (भाई) रिसबूड
9422372020
निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button