
अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवा, तुमची स्वप्नपुर्ती होईल – वैशाली साळुंखे-अडकूर
द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनच्या पत्रकार दिन व्याख्यानमालेचा शुभारंभ
रत्नागिरी, दि.०५, प्रतिनिधी : स्पर्धा परिक्षांची तयारी शालेय जीवनापासूनच करायला हवी. मला अधिकारी व्हायचंय असं ध्येय उराशी बाळगून मेहनत करा. एक दिवस तुमची स्वप्नपुर्ती होईल. तुमच्यामधूनही अधिकारी झालेले पाहून शाळेला अभिमान वाटेल असे उदगार सहाय्यक पोलीस निरिक्षक वैशाली साळुंखे- अडकूर यांनी काढताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला.
स्पर्धा परीक्षांचे महत्व या विषयावरील आज पहिले पुष्प सहाय्यक पोलीस निरिक्षक वैशाली साळुंखे-अडकूर यांनी गुंफले. मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये पत्रकार दिन व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरिक्षक वैशाली साळुंखे-अडकूर म्हणाल्या की, युपीएससी आणि एमपीएससी या दोन स्पर्धा परीक्षा असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीची परीक्षा घेते तर केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीच्या परीक्षा घेते. या स्पर्धा परीक्षांमधून आपण अधिकारी होऊ शकता. युपीएससीतून आपण आयएएस, आयपीएस होऊ शकता, एमपीएससीमधून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांसह अन्य काही अधिकारी पदांवर आपली नियुक्ती होऊ शकते. पोलीस वनविभाग आणि उत्पादनशुल्क विभागातील अधिकारी पदासाठी शारीरिक क्षमतेची अट असते. स्पर्धा परीक्षेमध्ये लेखी आणि मुलाखत अशा दोन परीक्षा असतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा तुम्ही जे गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी, नागरीकशास्त्र शिकता त्याच्यावर आधारीत प्रश्न असतात. चालू घडामोडींचाही अभ्यास खूप महत्वाचा असतो. मुलाखतीच्या परीक्षेला तुम्ही ज्या शाखेतून पदवीधर झाला आहात त्यावर संबंधित किंवा तुमच्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींवर आधारीत प्रश्न विचारले जातात. आपल्याला स्पर्धा परीक्षांविषयी काही माहिती नसते. त्यामुळे शालेय जीवनापासून तुम्हाला स्पर्धा परीक्षांची माहिती हवी. याकरीता द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनने स्पर्धा परीक्षांवरील व्याख्यानमालेचा स्तुत्य उपक्रम सुरु केला असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक वैशाली साळुंखे-अडकूर यांनी सांगितले. पुढे बोलताना वैशाली साळुंखे-अडकूर म्हणाल्या की, मी शाळेत असताना आम्हालाही अशाच एक महिला पोलीस अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या. त्यांचा खाकी गणवेश पाहून त्याचवेळी मी ठरवले होते की एक दिवस मी हा खाकी गणवेश परिधान करेन. त्या व्याख्यानामध्ये मी त्या अधिका-यांना खूप प्रश्न विचारले होते. तिथूनच मी एमपीएससीकडे वळले. तुम्हीही अशा व्याख्यानमालेतून प्रोत्साहन घ्या आणि स्पर्धा परीक्षांकडे वळा असे आवाहन त्यांनी करताना तुम्हाला स्पर्धा परीक्षांकरीता जे काही मार्गदर्शन लागेल त्याकरीता तुम्ही मला केव्हाही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटा किंवा मला फोनवरून संपर्क करा. मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेन असे आश्वासन देताना त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरातूनही संवाद साधला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी, द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दुर्गेश आखाडे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, तालुकाध्यक्ष सिध्देश मराठे, तालुका उपाध्यक्ष सचिन सावंत, तालुका सचिव पुर्वा किणे, नरेश पांचाळ, राजन चव्हाण, विनोद गावखडकर, अंजली पिलणकर, संतोष गार्डी, मिनल नाखरेकर, श्री.लोहार उपस्थित होते. संतोष गार्डी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अंजली पिलणकर यांनी आभार प्रदर्शन केले. आमच्या शाळेतूनही अधिकारी घडावेत – प्रज्ञा दळी
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी यांनी व्याख्यानमाला आयोजित केल्याबददल द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक वैशाली साळुंखे-अडकूर यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना या वयात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. तुमच्यामधूनही उद्या अधिकारी घडतील. आमची मुले खेळामध्ये अग्रेसर आहेत. त्याचा फायदाही त्यांना स्पर्धा परीक्षांमध्येही होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दुर्गेश आखाडे यांनी प्रस्तावनेत द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन गेली दोन वर्षे स्पर्धा परीक्षांवर व्याख्यानमाला आयोजित करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातूनही अधिकारी घडावेत आणि शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानेच या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com