राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण
राजापूर तालुक्यातील बारसू सालगांव परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाकरिता ड्रोन सर्वेक्षण व माती परिक्षणचे काम पूर्ण झाले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, तर रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागा निश्चित करणे ही बाब धोरणात्मक असून त्याबाबतचा निर्णय शासनाच्या स्तरावरील असल्याचा खुलासा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भू संपादन विभागाचे महाव्यवस्थापक संदीप आहेर यांनी पत्राद्ऐारे केला आहे.
बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ धोपेश्वर बारसू गोवळ दशक्रोशी रिफायनरी समर्थन समितीने १६ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. यामध्ये रिफायरी प्रकल्पासाठी ग्रामस्थांची व जमीन मालकांची सहमती असल्याचे स्पष्ट केले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाकडून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भू संपादन विभागाचे महाव्यवस्थापक संदीप आहेर यांनी या प्रकल्पाच्या भू संपादनाबाबत असलेली रिफायनरी प्रकल्पाची सद्यस्थिती या पत्राने कळविली आहे. www.konkantoday.com