सिंधुदुर्ग जिल्ह्यात बातमी छापणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कणकवली उपजिल्हा रूग्णालयातील एका डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पत्रकार भगवान सुरेश लोके यांनी काल (ता.२३) रात्री उशिरा फिर्याद दिली.यानंतर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत डॉक्टर विरोधात कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.
कणकवली उपजिल्हा रूग्णालयात गर्भवती मातांवर योग्य उपचार होत नसल्याच्या अनुषंगाने पत्रकार भगवान लोके यांनी आपल्या माध्यमातून बातमी प्रसारीत केली होती. ही बातमी दिल्याने आपली बदनामी झाल्याचा आरोप उपजिल्हा रूग्णालयातील त्या डॉक्टरने केला तसेच श्री. लोके यांच्या मोबाईलवर फोन करून धमकी दिली.
त्याचबरोबर श्री. लोके यांच्या विरोधात बदनामी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्या डॉक्टरकडून मारण्याची धमकी दिल्यानंतर श्री. लोके यांनी, आपल्या जीवितास त्या डॉक्टरकडून धोका असल्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीनंतर कणकवली पोलिसांनी त्या डॉक्टरविरोधात महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्थेच्या कलमांअन्वये गुन्हा दाखल केला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
www.konkantoday.com