राज्याचे मंत्री असलेले छगन भुजबळ मराठा आरक्षणाविषयी मंत्रिमंडळ बैठकीत किंवा मंत्री उपसमितीमध्ये काहीच बोलत नाहीत. मात्र, ‘तुम्ही जामिनावर बाहेर आहात, आरक्षणावर बोला,’ अशी धमकी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली असेल, म्हणून ते जाहीर सभेत आरक्षणावर बोलतात,’ असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केला.
दरम्यान, त्यांना घटना संपवायची आहे, म्हणून ते एकापाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
कोरेगाव येथील एका कार्यक्रमानिमित्त आमदार भास्कर जाधव आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप, केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, शहरप्रमुख अक्षय बर्गे, अशोक भोसले, कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पी. सी. भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उठविली. ‘मंत्री असूनही ते मंत्रिमंडळ बैठकीत बोलत नाहीत. बाहेर मात्र टीका करतात हे योग्य नाही. ‘तुम्ही फक्त जामिनावर बाहेर आहात,’ असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने धमकाविल्यानेच ते मराठा आरक्षणावर बोलत आहेत.
www.konkantoday.com