मराठा आरक्षणप्रश्नी ओबीसी महासंघाचा नारायण राणेंच्या भूमिकेला पाठिंबा : नितीन वाळके
मराठा आरक्षणासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. मात्र, मनोज जरांगे- पाटील यांच्या सरसकट मराठा आरक्षणाला आमचा आक्षेप आहे, असे स्पष्ट मत सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी व्यक्त केले.दरम्यान, सोमवार (दि. २०) पासून महासंघाच्या जनसंपर्क जिल्हा दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ डिसेंबर ते दि. २० डिसेंबर २०२३ पर्यंत तिन्ही प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे ओबीसी समाज संघटना जिल्हा महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक आज (दि.१८) पार पडली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष नितीन वाळके, रमन वायंगणकर, चंद्रशेखर उपरकर, नंदन वेंगुर्लेकर, बाळासाहेब बोर्डेकर, काका कुडाळकर आदीसह कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीनंतर वाळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नितीन वाळके म्हणाले की, ओबीसी महासंघाच्या एल्गार सभेत ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्या भूमिकेला सिंधुदुर्ग ओबीसी महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. तसेच त्यांच्या भूमिकेच्या अभिनंदनाचा ठराव आजच्या बैठकीत करण्यात आला. सोमवारपासून ओबीसी जनसंपर्क जिल्हा दौरा आयोजित केला आहे.
www.konkantoday.com