रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगडची जागा उद्धव ठाकरे गट लढवणार
लोकसभेच्या जागा वाटप झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर कोकणातील नेत्यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत जवळपास दोन तास चर्चा करण्यात आली. आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. गाफील राहू नका, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगडची जागा उद्धव ठाकरे गट लढवणार आहे. या दोन्ही जागा शिवसेनेच्यादृष्टीने महत्वाच्या आहेत. त्यामुळे ठाकरेंनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे.
ठाकरे यांनी नुकतेच मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीला खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, अनिल परब, रवींद्र वायकर, सुभाष देसाई, भास्कर जाधव, अनंत गीते आदी उपस्थित होते. पक्षप्रमुख ठाकरे यांनी बैठकीला आलेल्या नेत्यांशी संवाद साधला. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही मार्गदर्शन केले.
वेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेशच दिले. लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. निवडणुकीचे नियोजन करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची जोमाने तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
www.konkantoday.com