
छत्रपती संभाजीराजेंचे स्मारक उभारा आमदार निकमः, मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद.
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संगमेश्वर-कसबा या ऐतिहासिक ठिकाणी त्वरित जागतिक दर्जाचे स्मारक व संग्रहालय उभे करावे, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीला या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.आमदार निकम यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, आपल्या ३२ वर्षांच्या छोट्या आयुष्यात राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण केले, असे छत्रपती संभाजी महाराजांची गाथा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे हे तरुणाईसाठी प्रेरणादायक आहे.
महाराजांची पराक्रमी गाथा आपल्याला फक्त त्यांच्या शौर्यामुळेच नाही तर त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेमुळेही समजते. कमी वयात त्यांनी तीन महाकाव्यं लिहून आपली प्रतिभा दर्शवली.संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर हे ऐतिहासिक ठिकाण रायगडावरून पन्हाळा आणि गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी इथे एक वाडा बांधला होता. संभाजी महाराजांवर मोगल सैनिक चालून आले. त्या वेळी त्यांच्यात झालेली शेवटची लढाई, ज्यामध्ये ३०० ते ४०० मावळ्यांसोबत छत्रपती संभाजी महाराजांनी शौर्याचा ठसा उमठवला, ती हीच भूमी. या ऐतिहासिक भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्मारक व्हावे, ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. असे या निवेदनात नमूद केले आहे.