
आम्ही भाऊ-भाऊ एकत्र झालो तर सरकारला घाम फुटेल-मनोज जरांगे-पाटील
मराठा, धनगर, मुस्लिम, बंजारा हे आम्ही चार लहान-मोठे भाऊ आहोत. आरक्षणाबाबत आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही भाऊ-भाऊ एकत्र झालो तर सरकारला घाम फुटेल. कोणत्याही जातीवर अन्याय करू देणार नाही.24 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. 23 डिसेंबरला पुढच्या आंदोलनाची रणनीती स्पष्ट करणार आहे, असा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
मायणी येथे सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या सभेसाठी जरांगे-पाटील आले होते. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जरांगे पाटील नियोजित वेळेपेक्षा उशिरा आले तरीही गर्दी कायम होती. मायणी चांदणी चौकात त्यांच्यावर जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शासनाने तात्काळ हालचाली कराव्यात. काहीजण म्हणत आहेत सरकार आणखी वेळ मागणार आहे; पण इथे सांगतो आता जराही वेळ देणार नाही. 24 ला सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणारच. 1967 ला व 1990 ला कायदे धाब्यावर बसवून एका रात्रीत ओबीसी आरक्षण दिले गेले. 14 टक्क्यांचे आरक्षण 30 टक्क्यांवर नेले. मग मराठ्यांवरच अन्याय का? माझ्या आजवरच्या कारकिर्दीत एवढे निर्दयी सरकार मी पाहिले नाही, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.
www.konkantoday.com