
नामवंत बाल साहित्यकार कै. श्रीकांत गावंडे यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने कथालेखन स्पर्धेचे आयोजन
चिपळूण :: शंभराहून अधिक पुस्तके लिहिणारे चिपळूणचे सुपुत्र सिध्दहस्त बालसाहित्यकार कै. श्रीकांत गोवंडे सर यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली असून चिपळूण तालुका मर्यादित आहे.
साहित्य निर्मिती करताना गोवंडे सरांनी विशेषतः बालवाचकांना नजरे समोर ठेवून बहुतांश पुस्तके लिहिली आहेत. बाल,कुमार आणि युवा वाचक वर्गात ते अत्यंत लोकप्रिय होते. बालकथा आणि चरित्र या साहित्य प्रकारात त्यांनी विशेष लेखन केले. करमणुकी सोबतच प्रबोधन आणि संस्कार हा त्यांच्या लिखाणाचा मुख्य गाभा होता. वाचक म्हणून झालेल्या अनेकांच्या जडणघडणीत गोवंडे सरांच्या साहित्याचा मोठा वाटा आहे. अशा बहुआयामी लेखकाच्या स्मृती प्रीत्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदरची स्पर्धा दोन विभागात असून पहिला विभाग "बालविश्व कथा" असा असेल. या विभागात बाल, कुमार, युवा वयोगटातील वाचकांना भावतील अशा त्यांच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या संस्कारक्षम कथा असाव्यात अशी अपेक्षा आहे. दुसरा विभाग हा "मुक्त कथालेखन" विभाग असणार आहे. यात आशय, विषय, वाचकांचा वयोगट असे कोणतेही बंधन असणार नाही. कोणत्याही विषयावरची मुक्त कथा या विभागात पाठवता येतील.
स्पर्धक चिपळूण तालुक्यातील असावा. एका स्पर्धकाला एका विभागात एकच कथा पाठवता येईल. कथा ही भाषांतरीत, अनुवादीत, रुपांतरीत, आधारीत असू नये. ती कथालेखकाची स्वतंत्र निर्मिती असावी. कथेच्या स्वामित्व हक्कांबाबत काही वाद निर्माण झाल्यास ती जबाबदारी संबंधित स्पर्धकाची असेल. पहिल्या पृष्ठावर डाव्या भागात कथा कोणत्या विभागासाठी आहे त्याचा स्पष्ट उल्लेख असावा. कथेची शब्द मर्यादा १५०० शब्द इतकीच असावी. स्पर्धेकांनी कथेवर आपले नाव,पत्ता, मोबाईल क्रमांक अशी कोणतीही माहिती लिहू नये. सदरची माहिती स्वतंत्र कागदावर लिहून ती कथेसोबत जोडावी. दोन्ही विभागातील स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक प्रत्येकी १५००, द्वितीय क्रमांक प्रत्येकी १०००, तृतीय क्रमांक प्रत्येकी ७०० आणि स्मृतीचिन्ह असे बक्षीसांचे स्वरुप असेल. बक्षीस पात्र कथा लोटिस्माच्या मृदंगी या त्रैमासिकात प्रकाशित करण्यात येतील. तरी स्पर्धकांनी आपल्या कथा ३० डिसेंबर २०२३ पर्यंत प्रत्यक्ष किंवा लो. टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण, जि. रत्नागिरी ४१५६०५ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन वाचनालयाचे कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.
www konkantoday.com