माजी आमदार संजय कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सुकीवली गावातून आघाडी घेऊन दाखवावी. मी राजकीय संन्यास घेईन-शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे
माजी आमदार संजय कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सुकीवली गावातून आघाडी घेऊन दाखवावी. मी राजकीय संन्यास घेईन, असे प्रतिआव्हान शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी दिले.सुकीवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दिव्या होळकर विजयी झाल्यानंतर माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना तालुकाप्रमुख धाडवे यांच्यावर टीका केली. त्या टीकेला धाडवे यांनी उत्तर दिले असून, माजी आमदार कदम यांना प्रतिआव्हान दिले आहे. धाडवे म्हणाले, माजी आमदार कदम यांच्या म्हणण्यानुसार वास्तविक दापोलीतील चारही ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मंडणगडमधील दोनपैकी एका ठिकाणी शिवसेनेचा तर दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार समर्थक यांचे वर्चस्व आहे. खेडमधील सुकीवलीत जरी आमच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी ज्या प्रभागात ही निवडणूक होती तेथे आमच्या शिवसैनिकांनी उत्तम काम केले आहे.
गतनिवडणुकीत येथे आम्हाला ५० सुद्धा मते मिळत नव्हती. तिथे आम्ही या निवडणुकीत २२२ मते मिळवली आहेत. आमचा उमेदवार आर्थिकदृष्टीने गरीब असला तरी त्याने चार पक्षासोबत कडवी झुंज दिली. हे चार पक्ष एकत्र येऊन लढले आणि विजयी झाले. यात माजी आमदार संजय कदम जरी आनंद साजरा करत असले तरी त्यांनी हे विसरू नये की, चार महिन्यांपूर्वी सुकीवली सरपंचपदाच्या निवडणुकीत सुकीवलीमधील मतदारांनी त्यांना त्यांची पात्रता दाखवली आहे.
www.konkantoday.com