पाकिस्तान सरकारकडून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका
नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारने दिवाळीपूर्वी ८० भारतीय मच्छिमारांची सुटका केली. अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांचे स्वागत केले.
सुटका झालेल्या मच्छिमारांनी सांगितले की, मासेमारी करताना चुकून ते पाकिस्तानच्या हद्दीत शिरले होते. हे सर्व जण ३ वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात होते. पाकिस्तान सरकारच्या अवैध परदेशी स्थलांतरितांना आणि नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे.
भारतीय मच्छिमारांना अल्लामा इक्बाल एक्स्प्रेस ट्रेनने कडक सुरक्षा व्यवस्थेत लाहोरला आणले गेले. तेथून त्यांना वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात सोपवले. पाकिस्तानातील सेवाभावी संस्था ईधी वेल्फेअर ट्रस्टचे फैसल ईधी म्हणाले की, बहुतेक भारतीय मच्छिमार गरीब पार्श्वभूमीचे आहेत आणि त्यांना मायदेशी परतताना खूप आनंद झाला आहे. पाकिस्तानातील ईधी वेलफेअर ट्रस्टने स्वतः भारतीय मच्छिमारांना लाहोरपर्यंत आणण्याची व्यवस्था केली. हे सर्व जण लवकरच त्यांच्या कुटुंबीयांना भेटतील, याचा आम्हाला आनंद होत आहे. आम्ही त्यांना घर घेण्यासाठी काही रोख रक्कम आणि इतर भेटवस्तू दिल्या असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
www.konkantoday.com