
रत्नागिरीत प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई; 34 हजाराचा दंड वसूल
रत्नागिरी: ‘माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत रत्नागिरी पालिकेने प्लास्टिक मुक्तीसाठी मोहीम सुरु केली आहे. शहरातील ज्या दुकानांमध्ये प्लास्टिकचा वापर होतो त्या दुकान चालकांवर कारवाई करुन त्यांना दंड आकारण्यात येत आहे. या कारवाईत आता पर्यंत 34 हजारचा दंड करण्यात आला आहे. २२ सप्टेंबर पासून रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे व नगर परिषद कर्मचारी यांच्याद्वारे रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, रामनाका, पऱ्याची आळी, परटवणे, गोखलेनाका, गाडीतळ परिसरातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, स्वीट मार्ट, किराणा मालाची दुकाने या ठिकाणी सिंगल युज प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करण्यात आली. दुकानांमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना सुमारे ३४ हजार २०० रु. चा दंड आकारण्यात आला. यापुढे ही कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांनी दिला आहे.