आंबा बागायतदारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत,आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय
शासन कोकणातील आंबा बागायतदारांकडे पाहिजे त्याप्रमाणे लक्ष देत नाही, येथील आंबा बागायतदारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय बागायतदारांनी घेतला आहे.हिवाळी अधिवेशनापूर्वी उपोषणाचे हत्यार उपसले जाणार असल्याचा इशाराच आंबा बागायतदारांनी दिला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंबा बागायतदारांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी आंबा बागायतदार प्रकाश साळवी, प्रदीप सावंत, शेतीतज्ज्ञ अॅड. ज्ञानेश पोतकर, रामचंद्र मोहिते, नरेंद्र रसाळ, सुधीर देवळेकर, दिनेश भडवळकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
आंबा बागायतदारांना 2015 मध्ये मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. यावेळी कर्जाच्या तीन महिन्यांच्या व्याजाचा परतावा देण्याची घोषणा शासनाने केली होती. मागील आठ वर्षांत त्यातील एकही पैसा मिळाला नाही. वारंवार मागण्या, आंदोलन केल्यानंतर सुमारे 12 हजारांहून अधिक आंबा बागायतदारांची यादी तयार करण्यात आली. त्यातील आतापर्यंत फक्त 78 जणांना व्याजाचा परतावा देण्यात आला आहे. आंबा शेतकर्यांची ही एक प्रकारची चेष्टाच असल्याचे प्रदीप सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वच आंबा शेतकर्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे असे मत यावेळी प्रकाश साळवी यांनी मांडले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली. परंतु त्यातून प्रश्नांचा निपटारा झालेला नाही. आंबा शेतकर्यांना तुडतुड्याचा त्रास मागील काही वर्ष सातत्याने जाणवत आहे. यावर ठोस उपाय काढण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही
www.konkantoday.com