राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही-शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर
राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. असा कोणताही निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला नाही.यापुढे शिक्षकांच्या नवीन भरतीमधील उमेदवारांना जिल्हा बदली मिळणार नाही. त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत नियुक्तीच्या जिल्ह्यातच काम करावे लागणार आहे. दोन महत्वाचे निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी सांगितले.
रत्नागिरीमध्ये शनिवारी सिंधुरत्न योजनेच्या कार्यालयाचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री आणि सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष ना.दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, यापुढे आता क्वालिटी शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून होणार आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागील काही दिवस विरोधक अपूर्या माहितीच्या आधारे आरोप करीत आहेत. परंतु कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होणार नाहीत. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष भर देण्यात येणार आहे. राज्यात सुमारे ३० हजार नवीन शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अनेक ठिकाणी स्थानिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे तसे करता येत नाही. परंतु जिल्हा बदल्यांमुळे शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न निर्माण होतो.
www.konkantoday.com