रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या नुतनीकरणासाठी नगर परिषदेला ७ कोटी मंजूर

गेल्या अनेक वर्षापासून नाट्यगृह आणि तेथील समस्या याबाबत स्थानिक कलाकार रंगकर्मी यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. इतकेच नाही तर कित्येकदा ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र कमालीचे अनास्थेचे धोरण असल्याने नाट्यगृह वापरात होते. वातानुकुलीत यंत्रणा, पिण्याच्या पाण्याचा अभाव, बैठकव्यवस्था यासारख्या अनेक समस्या कालांतराने निर्माण झाल्या. यातील काही समस्या मार्गी लावण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने प्रयत्न केले गेले. मात्र ते फारसे प्रभावी ठरले नाहीत.
ज्यावेळी अभिनेते भरत जाधव यांनी याच समस्येबाबत प्रयोगादरम्यान भाष्य करत नाराजी व्यक्त केली तेव्हा पुन्हा एकदा सावरकर नाट्यगृहाचे नुतनीकरण आवश्यक आहे असा सूर उमटू लागला. त्यानंतर अत्यंत वेगाने रंगकर्मी, कलाकार यांनी पावले टाकली. उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत प्रातिनिधीक स्वरुपात कलाकारांनी चर्चा केली व मंत्री सामंत यांनीही नुतनीकरण करण्याचे आश्‍वासन दिले. जे आता सत्यात उतरताना दिसत आहे.
माजी नगराध्यक्ष कै. उमेश शेट्ये यांच्या प्रयत्नामुळे हे नाट्यगृह उभारण्यात आले मात्र व्यवस्थापनाच्या दृष्टीने या नाट्यगृहाला उतरती कळा लागली. त्यातच कोट्यवधी रुपये खर्चुन वातानुकुलीत यंत्रणा बसवण्यात आली मात्र ती निष्प्रभ ठरली. यात नंतर अनेक समस्यांची भर पडत गेली.
नगर परिषदेकडून प्राप्त माहितीनुसार शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ७ कोटींचा निधी मंजूर झाला असून यानुसार ७ कोटींमधील स्थापत्यकामासाठी ४ कोटी खर्च केला जाणार आहे. ज्याअंतर्गत सिलिंग बैठकव्यवस्था व अन्य बांधकामाचा समावेश आहे. तर उर्वरित ३ कोटी हे ध्वनी यंत्रणा, प्रकाशयंत्रणा, अग्नी व्यवस्थापन यासाठी खर्च केले जाणार आहे. नवीन फिडर, वातानुकुलीत यंत्रणा, आधुनिक रंगमंच, साऊंसिस्टीम, ऍकोस्टिक, रंगरंगोटी, छत दुरूस्ती तसेच नाट्यगृहाबाहेरील दुरूस्ती या कामाचा समावेश आहे.
या कामाचा ठेका हा निर्माण ग्रुपने घेतला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे त्यामुळे नाट्यगृहातील समस्यांवर होणार्‍या चर्चेला आता विराम मिळणार असून कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी नाट्यगृह नव्या ढंगात उपलब्ध होणार आहे.
गेली काही वर्षे समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाचे रुपडे पालटू लागले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या नुतनीकरणासाठी नगर परिषदेला ७ कोटी मंजूर झाले आहेत. सध्या नुतनीकरण कामाला सुरूवात झाली असून २६ जानेवारी २०२४ ला या नाट्यगृहाचे उदघाटन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कामाच्या अनुषंगाने नाट्यगृह अडीच महिने बंद राहणार आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button