रस्ता डांबरीकरणासाठी वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी देवशेत फणसवळे या रस्त्याचे गेल्या काही वर्षात एकदाही डांबरीकरण केलेले नाही. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खराब रस्त्यांमुळे एसटीच्या फेर्या कमी केल्या आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड ग्रामस्थांना पडत आहे. रस्ता डांबरीकरण मंजूर होवूनही अद्याप काम सुरू करण्यात न आल्याने ग्रामस्थांनी पंकज साप्तिकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे.
वाशी तर्फे संगमेश्वर येथील रस्ता बुरंबी ते देवशेत फणसवळे या रस्त्यात इतके खड्डे आहेत की, कित्येक नागरिकांचे अपघात होवून त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत. त्यात एका महिलेचा अपघाती मृत्यू देखील झालेला आहे.
एसटी बसचालक अक्षरशः रस्ता खराब असल्यामुळे बस फेर्या कमी करतात. रिक्षाचालक तर ८ कि.मी. रोडला ६०० ते ९०० रुपये अवाजवी भाडे आकारत आहेत. तरी आपण हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा अशी आंदोलकांची मागणी आहे.
www.konkantoday.com