
भोके-फणसवळे नदीपात्रात आढळून आलेल्या तरूणाच्या मृतदेहाबाबत घातपात झाला असल्याचा संशय
रत्नागिरी तालुक्यातील भोके-फणसवळे नदीपात्रात आढळून आलेल्या तरूणाच्या मृतदेहाबाबत घातपात झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कुजलेल्या अवस्थेत पुरूषाचा हा मृतदेह नग्न अवस्थेत स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून संशयास्पद स्थितीत असलेल्या या मृतदेहाबाबत पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
फणसवळे गावचे पोलीस पाटील विष्णू ठिक यांनी मृतदेहाबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी स्थानिक ग्रामस्थ सुरेश शिंदे यांना भोके फणसवळे नदीच्या माणकरी ढव धरण पात्रामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला होता. याबाबत शिंदे यांनी गावचे पोलीस पाटील विष्ण ठिक यांना हा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून ठिक यांनी पोलिसांना कुजलेल्या स्थितीत मृतदेह असल्याचे कळविले.
पोलिसांनी या ठिकाणी जावून पाहणी केली असता अंदाजे ४५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह असल्याचे दिसून आले. मृतदेह संपूर्ण नग्न अवस्थेत असून उंची ५ फूट ५ इंच आहे. तोंड उघड्या स्थितीत असून दोन्ही डोळ्यांची बुबुळे बाहेर आलेली होती.
www.konkantoday.com