चिपळूण येथील कोसळलेल्या पुलाबाबत केंद्रीय तज्ज्ञ समितीचा चौकशी अहवालही अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागास प्राप्त नाही
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचा भाग आणि त्यावरील लाँचर्स अद्यापही लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत.कोसळलेला पुलाचा भाग काढण्याबाबत आता डिझाईन तयार करण्याचे काम सुरू आहे. या डिझाईनला मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय तज्ज्ञ समितीचा चौकशी अहवालही अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागास प्राप्त झालेला नाही. उड्डाणपुलाच्या सर्वच कामाला विलंब लागण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग अजूनही जागेवर तसा पडून आहे. त्यावरील अजस्त्र लाँचर यंत्रणाही तशा लोंबकळत आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या सर्व्हिसरोडवरून वाहतूक सुरू असल्याने पुलाचे चित्र भीतीदायक आहे. याबाबत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोसळलेला पूल, त्यावरील लाँचरसह यंत्रणा ही मोठ्या वजनी आहेत. शिवाय त्यामध्ये टाकलेल्या केबल्सही व्यवस्थित हाताळणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलाचा कोसळलेला भाग आणि लाँचर यंत्रणा कशी काढायची याबाबतचे डिझाईन तयार केले जात आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ते काम हाती घेतले जाणार आहे.
www.konkantoday.com