आणखी ४ देशांना आंब्याची भुरळ, निर्यातीत होणार्या देशांची संख्याही वाढली
कोरोनानंतर पूर्वपदावर येत असलेल्या व्यापार उद्योगाने आता विस्ताराला सुरुवात केली आहे. काही वर्षे त्या त्या देशातील अटी व नियमांची पूर्तता न झाल्याने निर्यातीत फटका बसलेल्या आंब्याने यावर्षी मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. देशाच्या एकूण आंबा निर्यातीत यावर्षी तब्बल १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबरोबरच आंबा निर्यातीत होणार्या देशांची संख्याही वाढली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य वेळी उचललेली पावले, विशेषतः कृषी कल्याण मंत्रालय, आपेडा आदी नियंत्रण संस्था यांच्या विशेष प्रयत्नातून आंबा निर्यातीला चालना मिळाली आहे. जीआय टॅगिंगसह, विविध देशातील निकषाची पूर्तता, वाशी, नाशिक, अहमदाबाद, बेंगलोर येथे प्रोसेसिंग प्लँटची उपलब्धता आदीमुळे शेतकरी वर्गही यामध्ये सहभागी होत आहे. याचा परिणाम म्हणून यावर्षी विविध ४१ देशांमध्ये सुमारे २८ हजार मेट्रीक टन आंब्याची निर्यात झाली. यामध्ये मेरिका, इंग्लंड, जपान, न्यूझीलंड, युएइ आदी देशांच्या यादीत चार नव्या देशांची भर पडली आहे. दक्षिण कोरियामध्ये पुन्हा एकदा निर्यात सुरू झाली असून मॉरिशस, नायजेरिया, इराण, झेक रिपब्लिक या चार देशात नव्याने निर्यात सुरू झाली आहे. पहिल्याच वर्षी या पाच देशात ६० मेट्रिक टनांच्या जवळपास आंबा निर्यात झाल्याचे सांगण्यात आले.
www.konkantoday.com