
पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलेला सुमारे २५ लाख रूपयांचा गंडा
पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलेला सुमारे २५ लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी नरेेंद्र याने फसवणूक केलेल्या २५ लाख रूपयांपैकी केवळ ५ लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
स्नेहल पाटील (रा. मिरजोळे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. स्नेहल पाटील यांचा आंब्याचा व्यवसाय आहे. आरोपी नरेंद्र मुळे यांच्याशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. याच ओळखीतून नरेंद्र मुळे याने स्नेहल यांना पैसे दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखविले होते. आपले पैसे दुप्पट होणार या आशेने स्नेहल यांनी नरेंद्र यांच्याजवळ २५ लाख रूपये दिले. यातून तुम्हाला ५० लाख रुपये मिळवून देतो, असे नरेंद्र याने सांगितले होते.
अनेक महिने उलटूनही आपले पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्नेहल यांच्या लक्षात आले. त्यानुसार स्नेहल यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संशयित आरोपी नरेंद्रविरूद्ध गुन्हा दाखल केला.
www.konkantoday.com