गांजा विक्री मास्टरमाईंड लटकेला पुन्हा अटक
गाजा सेवन करणार्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून हा गांजा त्यांनी बॉडीबिल्डर अमर लटकेकडून विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार पोलिसांनी लटके याला सोमवारी ताब्यात घेत पुन्हा अटक केली आहे. लटके याला पुन्हा अटक झाल्याने शहरपरिसरात खळबळ माजली असली तरी तो गांजा कोठून आणतो हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे.
लांजा शहरातील विरेश्वर तलाव परिसरातील एका इमारतीत चौघेजण गांजा सेवन करत असताना नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्या चौघांच्या पोलीस चौकशीतून तो गांजा त्यांनी एका बॉडीबिल्डरकडून आणल्याची माहिती दिल्यानुसार पोलिसांनी शहरातील सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर अमर लटकेला ताब्यात घेत याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता.
असे असताना शहरातील मोक्याच्या ठिकाणी बिनधास्तपणे गांजा सेवन करणार्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर रविवारी विजय शांताराम राणे (५६, रा. मुरादपुर, भोईवाडी), ओंकार सुभाष कराडकर (२६, टेरव, कुंभारवाडी), अमीर शेखर (२३, मुरादपूर), या तिघांना अटक केली होती.
त्यांनी हा गांजा कोठून आणला याची पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तो बॉडीबिल्डर अमर लटके याच्याकडून आणल्याची माहिती दिली. त्यानुसार लटके याला पुन्हा सोमवारी अटक करण्यात आली आहे.
www.konkantoday.com