
*निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात*
निवडणूक आयोगाकडुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. शरद पवार गटाच्या वतीने हे प्रकरण तातडीने सुनावणीस घ्यावे, अशी विनंती उद्या न्यायालयाला केली जाऊ शकते.१२ फेब्रुवारीला याचिका दाखल केल्यानंतर १४ फेब्रुवारीला शरद पवार गट या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने विनंती केल्यास येत्या शुक्रवारी किंवा सोमवारी या प्रकरणावर सुनावणी होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा केला. हा वाद पुढे निवडणूक आयोगात गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने सहा महिन्यात १० पेक्षा अधिक सुनावण्या घेतल्या. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची ओळख स्पष्ट करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ असे नाव देखील शरद पवार गटाला निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहे.निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर अजित पवार गटाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यामुळे न्यायालयात शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी होईल तेव्हा अजित पवार गटाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल.www.konkantoday.com