
रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धाखुल्या गटामध्ये हनुमंत चोपडे विजेताअनुप पवार, सुजाता वाघेरे, मेरियन डिसुझा आपापल्या गटामध्ये प्रथम
रत्नागिरी
भाट्ये ते गावखडी व परत भाट्ये हे ४५ किमीचे अंतर अवघ्या १ तास २२ मिनिटांत पार करून पुरुषांच्या खुल्या गटात पुण्याच्या सिंहगड फाउंडेशनच्या हनुमंत चोपडे याने रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे विजेतेपद पटकावले. खुल्या गटातील स्पर्धकांचा सुस्साट वेग पाहून धडकी भरली. रत्नागिरीत प्रथमच अशी थरारक सायकल स्पर्धा रंगली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राबाहेरूनही २०० स्पर्धक सहभागी झाले. आता प्रतिवर्षी ही स्पर्धा घेण्याचा आयोजकांचा मानस आहे.
रविवारी सकाळी ६ वाजता स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोमेंडीच्या शासकीय रोपवाटिकेचे प्रमुख राजेंद्र कुंभारे आणि रेस अक्रोस अमेरिका स्पर्धेचे विजेते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर डॉ. महेंद्र महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या स्पर्धेसाठी हॉटेल विवेकने बहुमोल सहकार्य केले. तसेच जय हनुमान मित्रमंडळ, आरडीसीसी बॅंक, मार्गावरील सर्व ग्रामपंचायती, शाळांनी मनुष्यबळ दिले तसेच हायड्रेशन पॉईंटची व्यवस्थाही केली. वाहतूक पोलिसांचे उत्तम सहकार्य लाभले. जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.
खुल्या गटात सुमारे पन्नास ते साठ स्पर्धक सहभागी झाले. सर्वजण नामांकित खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू असल्याने जोरदार तयारी होती. दिमाग से खेलेगा वही जितेगा अशी टॅगलाईन होती. भाट्याचा पहिला चढाव पार करून पुढे सपाट रस्ता, गोळपला उतार, पावस बायपास रोडची वळणे, चढ, नंतर तीव्र उतार, पुन्हा वळणावळणांचा चढणीचा रस्ता, गावखडीचा तीव्र उतार अशा रस्त्यावरून स्पर्धक सुस्साट वेगाने जाताना पाहायला मिळाले. विजेत्यांनी गावखडीला फक्त ४५ मिनिटांत पोहोचून अवघ्या १ तास २२ मिनिटांत पुन्हा भाट्यात पोहोचले. पहिले दहा क्रमांक हे अगदी थोडक्या फरकाने विजेते झाले. पावस येथे विद्यार्थी, ग्रामस्थांनी ढोल-ताशे वाजवून व रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनप्रसंगी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, राज्यातील सायकलिस्टना ही स्पर्धा, अनुभव कायमस्वरूपी लक्षात राहील. इथले वातावरण, निसर्ग तुम्हाला नक्कीच आवडेल. ही स्पर्धा वर्षानुवर्षे सुरू राहील. पर्यटनवृद्धी, स्थानिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण व्हावी हे स्पर्धेचे उद्देश सफल होतील. जिल्हाधिकारी सिंह यांनी तंदुरुस्ती आवश्यक आहे. स्पर्धकांनी असाच सहभाग घेत राहा. पुढील स्पर्धेत आम्हीसुद्धा भाग घेऊ असं बोलून, शुभेच्छा दिल्या.
बक्षीस वितरण कार्यक्रम हॉटेल विवेक येथे झाला. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. महेंद्र महाजन, स्पर्धेचे ब्रॅंड अँबेसिडर अमित कवितके, हॉटेल्स असोसिएशनचे उदय लोध, लायन्स क्लबच्या अध्यक्ष सौ. शिल्पा पानवलकर, क्लबच्या महिला प्रतिनिधी सौ. आरती पानवलकर उपस्थित होत्या. शिरीष सासणे, विनय रेवडेकर यांच्या हस्तेही बक्षीसे दिली. तसेच महेश दाभोळकर यांनी मुंबईवर आधारित तयार केलेली जर्सी विजेत्यांना प्रदान केली. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सर्व सदस्य, स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-
पुरुषांचा खुला गट (एलाईट)- हनुमंत चोपडे (पुणे, सिंहगड फाउंडेशन, वेळ १ तास २२ मिनिटे १४ सेकंद), सिद्धेश पाटील (पुणे), हर्ष पवार (पनवेल), विठ्ठल भोसले (पुणे), अश्विन मर्ढेकर (कऱ्हाड), रिहान शेख (परभणी), प्रथमेश दरेकर (पुणे ), हेमंत लोहार (पुणे), आर्यन मालगे (पुणे) आणि ॲशविन फर्नांडिस (गोवा).
४० वर्षावरील गट (मास्टर)- अनुप पवार (मुंबई १ तास २८ मिनिटे १० सेकंद), राजेश रवी (पुणे), सतीश सावंत (पुणे), आशिष जोशी (पुणे), विष्णू तोडकर (कारवार), पंकज मारलेशा (मुंबई), प्रवीण पाटील (मुंबई).
महिला गट- सुजाता वाघेरे (नाशिक, १ तास ४६ मिनिटे १० सेकंद), प्राजक्ता सूर्यवंशी (विटा, सांगली), योगेश्वरी कदम (सांगली), अश्विनी देवरे (नाशिक), केनिश डिमेलो (पालघर), शमिका खानविलकर (रत्नागिरी), भावना द्विवेदी (पुणे).
५५ वर्षांवरील गट- मेरियन डिसुझा (मुंबई), डॉ. आदित्य पोंक्षे (पुणे), सुधाकर पाटणकर (मुंबई).
एसआरचा सन्मान
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे ९ सदस्य एसआर झाले. अमित कवितके, डॉ. नितीन सनगर, यतिन धुरत, तृणाल येरूणकर, महेश (बॉबी) सावंत, ओंकार फडके, अमित पोडफोडे, शुभम शिवलकर, अनुप मेहेंदळे यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी दोन विशेष सत्कार केले. यामध्ये नॉनगिअर सायकलवरून दोन तासांच्या आत स्पर्धा पूर्ण करणारे ८० वर्षीय सायकलपट्टू भीमराव सूर्यवंशी आणि १० वर्षांची सायकलपट्टू सान्वी पाटील (सव्वादोन तास) यांना गौरवण्यात आले.
२५ राष्ट्रीय, राज्य खेळाडू
आजच्या स्पर्धेत २५ हून अधिक राष्ट्रीय व राज्य स्पर्धा खेळणारे खेळाडू होते. या खेळाडूंचा सरासरी वेग ताशी ५० किमी होता व स्पर्धा जिंकण्यासाठी शेवटच्या १२०० मीटरमध्ये हा वेग जवळपास ६५ च्या पुढे होता. या स्पर्धेत ३ लाख रुपयांपासून १३ लाखांपर्यंतच्या सायकली पाहण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळाली. भाट्ये, कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी ग्रामंपचायतींचे बहुमोल सहकार्य लाभले.
www.konkantoday.com
