राजापूर शहरातून वाहणार्या अर्जुना नदीकाठावर आढळला राखी बगळा
राजापूर शहरात वाहणार्या अर्जुना नदीकाठी परिसरामध्ये गेल्या काही वर्षामध्ये विविध पक्षांचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. या नदीकाठावरील बंदरधक्का परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या करड्या रंगाच्या राखी बगळ्यांचे वास्तव्य आहे. श्री पुंडलिक मंदीर परिसरामध्ये अर्जुना नदीपात्रामध्ये वा काठावर माथ्यावर लोंबणारी तुरेवजा काळी पिसे, खंजिरा समान जाड आणि टोकदार पिवळसर चोच आणि अंतर्भागावर काळे पट्टे अशी रंगछटा अन शरीराचा आकार असलेला राखी बगळा सार्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
मत्स्याहारी असलेला राखी बगळा जल किडे, बेडकी, पाणसाप, सरपटणारे छोटे प्राणी खाते. शिकारीसाठी इतर पक्ष्यांप्रमाणे गनिमी काव्याचा वापर न करता मोकळ्या जागेमध्ये उभा असल्याचे दिसतो. भक्ष्यासाठी न हिंडता आणि खोल पाण्यात न जाता उथळ, साधारणपणे गुडघ्या एवढ्या पाण्यात स्तब्ध, शांतपणे उभा राहून तो भक्ष्य आपल्या टप्प्यात येण्याची वाट पाहतो. यावेळी तो वचकाप्रमाणे गाढ झोपेत असल्याचा भास होतो. www.konkantoday.com