चिपळूण शहरात गांजा विक्री करताना दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
चिपळूणात गांजा विक्री करताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्या दोघांकडूनही प्रत्येकी १०० ग्रॅमची पुडी जप्त केली असून त्यांची तत्काळ चौकशी सुरू केली आहे. अजूनही काहीजण पोलिसांच्या रडावर असून या धडक कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. विजय शांताराम राणे (५६, रा. मुरादपूर भोईवाडी), ओंकार सुभाष कराडकर (२६, टेरव कुंभारवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
यातील विजय राणे हा घराच्या शेजारीच तर ओंकार कराडकर हा शहरातील खेड बावशेवाडीतील आमराईत गांजा विक्री करताना आढळला. काही दिवसांपूर्वी शहरातील विरेश्वर तलाव परिसरात एका इमारतीत दोघांना गांजा सेवन करतेवेळी नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या घटनेनंतर पोलिसांनी बॉडीबिल्डर अमर लटके याला गांजा विक्री प्रकरणी अटक केली होती.
शहरात बिनधास्तपणे होत असलेल्या गांजा विक्री बहाद्दरावर कारवाईसाठी धडक मोहीम हाती घेतली असून यातून शहरातील मोक्याची ठिकाणे पिंजून काढली जात आहेत, असे असतानाच विजय राणे, ओंकार कराडकर या दोघांना गांजा विक्री करताना पकडले. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
www.konkantoday.com