देवरूखातील फुलपाखरांचे गाव कुंडी आताआंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये
देवरूखजवळील कुंडी गावातील फुलपाखरांची जैवविविधता याविषयी प्रतिक मोरे, डॉ. शार्दुल केळकर आणि प्रताप नाईकवाडे यांनी केलेले संशोधन नुकतेच बायोइनफोलेट जीवशास्त्रविषयक आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. कुंडी गाव देवरूखपासून जवळपास १५ कि.मी. वर सह्याद्रीच्या खोर्यात आहे. महिमतगड व त्या परिसरात वाहणार्या नदीच्या खोर्यात फुलपाखरांच्या जवळजवळ ९५ हून अधिक प्रजातींची नोंद यानिमित्ताने करण्यात आली आहे. दुर्गम भागात वसलेल्या कुंडी गावाची अनोखी जैवविविधता यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
फुलपाखरे ही उत्तम पर्यावरण परिस्थितीची निर्देशक मानली जातात. फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या ही एखाद्या परिसरात आढळणार्या वनस्पती, तेथील संपन्न अधिवास व प्रदूषणविरहित पर्यावरण यावर प्रामुख्याने अवलंबून असते. त्यामुळे १०० च्या आसपास आढळणार्या फुलपाखरांच्या प्रजाती हे उत्तम नैसर्गिक परिस्थिती व अबाधित असणारा अधिवास याचे फलस्वरूप मानले जाते. कुंडी गाव हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिशय जवळ वसले असून इथले बहुतांश जंगली व देवराई अबाधित असल्याने हे जीवसृष्टीसाठी नंदनवन ठरत असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
कुंडी परिसरात या अभ्यासानिमित्ताने जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत फुलपाखरांचे सर्वेक्षण करण्यात आले. गावातील देवराई, जंगलातील वाटा, नदी-नाले, ओढे यांच्या काठांवर येणारी फुलपाखरे छायाबद्ध करण्यात आली. यातून कुंडी परिसरात फुलपाखरांचा ६ कुळातील सुमारे ९५ फुलपाखरांच्या प्रजाती मिळाल्या आहेत. यात ऍबनॉर्मल सिल्हरलाईन, मलबार बँडेड पीकॉक राजा, त्वाय राजा ब्लॅक अशा अनेक दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे. तसेच फुलपाखरांना आवश्यक असणार्या खाद्यवनस्पतींची उपलब्धताही येथील जंगलात असल्यामुळे फुलपाखरांच्या अनेक पिढ्या इथे पहायला मिळतात. www.konkantoday.com