
बचत गटाच्या माध्यमातून जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार
बचत गटाच्या माध्यमातून जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे
पर्यटनाला चालना देतानाच महिलांना रोजगारसंधी देण्यासाठी केरळच्या धर्तीवर जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) सिंधु-रत्न योजनेत दोन कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे.या बोटी महिला बचतगट चालवणार आहेत.
जलपर्यटनाला वाढती पसंती लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हाऊसबोटींगची संकल्पना पुढे आणली. जिल्ह्याला लाभलेल्या खाड्यांमधील जैवविविधता परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुली केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे लक्षात घेऊनच हा प्रकल्प अंमलात आणला जात आहे. महिला बचतगटांना ही हाऊसबोट चालवण्यास दिली तर महिलांना रोजगाराचा पर्याय मिळणार आहे.यासाठी डीआरडीएमार्फत बचतगटातील १२ महिलांना हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी केरळमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर हाऊसबोटींगसाठी सुरक्षित आणि परिपूर्ण असलेल्या जयगड आणि दाभोळ खाड्यांची निवड केली. दोन्ही खाड्यांचा परिसर निसर्गरम्य आहे. येथील किनाऱ्यावर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळतात. दाट जंगल, मासे पकडण्याचा अनुभव येथे मिळू शकतो.
पर्यटकांना एक रात्र बोटीमध्येच राहण्यासाठी सुरक्षित जेटीही उभारणे शक्य आहे. दोन्ही खाड्यांमध्ये प्रवासी बोटींसाठी शासकीय जेटी येथे आहेत. त्याचा वापर हाऊसबोटींसाठी होईल. एका बोटीमध्ये दोन कुटुंबे म्हणजेच आठ व्यक्ती राहतील, अशी व्यवस्था असेल. एका बोटीची किंमत ८० लाख ते १ कोटी रुपये आहे. सिंधु-रत्न योजनेतून निधी मिळणार असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
www.konkantoday.com