
13 म्हशींचा होरपळून मृत्यू! आ. शेखर निकमांनी शेतकर्याला केली आर्थिक मदत
संगमेश्वर : तालुक्यातील पाचांबे (नेरदवाडी) येथील जळीत गोठ्याची आ. शेखर निकम यांनी तातडीने दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त संजय जाधव यांना तातडीची आर्थिक मदतही केली. पाचांबे (नेरदवाडी) येथे मुसळधार पावसात येथील शेतकरी संजय जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडली. यानंतर गोठ्याला आग लागून संपूर्ण गोठा जळून खाक झाला. गोठ्यातील तब्बल 13 जनावरांचा होरपळून अतिशय दुर्देवीरित्या मृत्यू झाला. यामध्ये संजय जाधव यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची आ.शेखर निकम यांनी तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हतबल झालेले शेतकरी संजय जाधव यांना आ. निकम यांनी धीर दिला व तातडीने आर्थिक मदत
केली. या घटनेबाबत शासकीय यंत्रणेला योग्य त्या सूचना करून तत्परतेने शासकीय मदत व्हावी, असे संबंधित अधिकार्यांना त्यांनी सागितले. यावेळी सरपंच संदेश घाडगे, शाम घाडगे, विनोद मस्के, विनोद ताठरे, प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.