कंत्राटी आरोग्य सेविकांच्या आंदोलनामुळे रिक्त पदी समायोजन रखडले
जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये (एनएचएम) काम करणार्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी गेल्या २ दिवसांपासून नियमित रिक्त पदांवर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त आरोग्य सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
या आंदोलनाबाबत जि.प. प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मागील १५ ते २० वर्षापासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी इ. संवर्गातील कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत आहेत. नुकत्याच कोरोना महामारीत आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देवदुतासारखे रात्रंदिवस आरोग्य सेवा दिली आहे. मात्र मागण्यांबाबत अनेकवेळा निवेदने देवूनही दुर्लक्ष केले गेल्याचे सांगण्यात आले.