
आचारसंहितेमुळे साध्या पिशव्यात मिळणार आनंद शिधा
राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात येणार्या आनंद शिध्याला आता ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेचा परिणाम झाला आहे. आता जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींमधील शिधा धान्य दुकानांवर मिळणार्या आनंद शिध्यावर याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या ग्रामपंचायतींमध्ये वितरित होणार्या शिधा संचांबाबत आता राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने माहिती मागवली आहे. त्यामुळे आता आनंद शिध्यावरील राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री यांचा फोटो हटवून आता नवीन कोणत्या पिशव्यांमध्ये वितरण होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिवाळीनिमित्त आता सर्व शिधापत्रीकाधारकांना १०० रूपयात चार नव्हे तर सहा जिन्नस वस्तू मिळणार आहेत. दिवाळीनिमित्त करण्यात येणार्या आनंदशिध्यामध्ये आता रवा, साखर, चणाडाळ, तेल, यासोबतच पोहे आणि मैदा यांचाही समावेश असणार आहे.