स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीबाबतरत्नागिरी सीए शाखेतर्फे चर्चासत्राला प्रतिसाद
रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक आणि त्या संबधित आयकारमधील तरतुदी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी शाखेने स्टॉक मार्केट या विषयावर आयोजित केलेले हे पहिलेच सत्र होते. या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला.
हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येथे हे चर्चासत्र दिवसभर दोन सत्रात घेण्यात आले. ठाण्याचे प्रसिध्द शेअर मार्केटतज्ञ सीए निखिलेश सोमण यांनी फ्युचर आणि ऑप्शन जोखीमसंबंधी, स्टॉक मार्केटमधील ट्रेडिंग करताना घ्यावयाची काळजी आणि गुंतवणुकदारांची मानसिकता या विषयावर मार्गदर्शन केले. विविध उदाहरणे देत त्यांनी सुरेख मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये रत्नागिरी येथील सीए अनुप शहा यांनी स्टॉक मार्केटवरील विविध प्रकारचे व्यवहार, क्रिप्टो करंन्सीबाबतचे व्यवहार, इंजल टॅक्स, शेअर बायबॅक, बोनस या विषयांवर आयकरमधील विविध तरतुदीवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी शाखेचे आतापर्यंत घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. समाजामध्ये स्टॉक मार्केट हा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून लोकप्रिय होत असल्याचे सांगितले. स्टॉक मार्केटमधील विविध व्यवहार व त्याच्या आयकरमधील तरतुदी समजावून घेऊन त्याचप्रमाणे पक्षकाराला योग्य सल्ला देणे, ही चालू काळातील गरज असल्याचे आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले.
याप्रसंगी सचिव सीए शैलेश हळबे, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर आणि सदस्य सीए प्रसाद आचरेकर यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील सनदी लेखापाल, रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ आयकार सल्लागार चंद्रकांत हळबे या चर्चासत्राला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए शैलेश काळे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत सीए श्रीकांतभाऊ वैद्य यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सीए धनश्री करमरकर यांनी करून दिला. शाखेच्या उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी आभार मानले.
www.konkanyoday.com