
राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे मद्य वाहतूक कारवाईवेळी गोळीबार, संशयिताचा जामीन फेटाळला
राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे अवैध मद्यवाहतूक कारवाई केल्याच्या रागातून गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. ५ सप्टेेंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. संशयिताच्या ताब्यातून सुमारे ८२ लाख रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेताना ही थरारक घटना घडली होती.
रमेशकुमार मंगलराम चौधरी (३२, रा. बाडनेर राजस्थान) महावीर मारूती भोसले (३७), ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे (२१), शेखर नेताजी भोसले (२७), प्रवीण परमेश्वर पवार (३२, रा. सर्व ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर संशयितांकडून सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंबाळकर यांनी यावर निकाल दिला.