रत्नागिरी शहरातील सांडपाण्यामुळे घूडेवठार दत्त मंदिरजवळ घाणीचे साम्राज्य
डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यूची साथ वाढली, नगरपरिषदेकडून कायमस्वरूपी कार्यवाही नाही, उपाय योजनेकडे दुर्लक्ष*
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते खारेघाट मार्गाच्या बाजूने येणारे संपूर्ण सांडपाणी घूडेवठार येथील दत्त मंदिरा जवळील मोकळ्या जागेत साठलेले असून या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डासांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. याचा त्रास विलनकरवाडी, चवंडेवाडी, घूडेवठारपासून मांडवी पर्यंतच्या नागरिकांना भोगावा लागत आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या सांडपाण्याचा निचरा तातडीने समुद्रापर्यंत पाईपलाईन टाकून करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे संयोजक सुरेश ऊर्फ अण्णा लिमये आणि सचिव सुरेंद्र घूडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यकांत सूर्यवंशी यांना तसेच रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे श्री काटदरे यांना निवेदन सादर केल्यानंतर या भागात तात्पुरती डास प्रतिबंध फवारणी करण्यात आली. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत नगरपरिषद उदासीन असून आता येथील नागरिक नगर परिषदेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.
घुडे वठार येथील शेततळ्यात चिखल आणि सांडपाण्याचा एवढा साठा झाला आहे की तेथे आता कमळे फुलू लागली आहेत. या परिसरातील डेंग्यूचे रुग्ण रत्नागिरी तसेच अति गंभीर रुग्ण कोल्हापुरात उपचार घेत आहेत. त्यामुळे याप्रकरणी गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
www.konkantoday.com