वाळू व्यवसायाच्या बहाण्याने फसवणूक, संशयिताला जामीन
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे वाळू व्यवसायात मोबदला देण्याचे आमिष दाखवून १ कोटी १० लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या संशयिताला न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. कमलेश विद्याधर सुर्वे (४७, रा. नांदिवडे, भंडारवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. जयगड पोलिसांत फसवणुकीचा दाखल होताच सुर्वे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. जयगड पोलिसांत फसवणूक झाल्याप्रकरणी चंद्रशेखर वसंत गडदे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संशयित कमलेश याने आपण वाळू व्यवसाय करणार असल्याची बतावणी चंद्रशेखर यांना केली होती. व्यवसायासाठी आपल्याच पैशाची गरज असून वाळू व्यवसायात प्रतिटन २५० रुपये मोबदला देण्याचे आमिष कमलेश याने चंद्रशेखर यांना दाखविले. कमलेश याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चंद्रशेखर यांनी सन २०२० ते २०२२ या काळात १ कोटी २१ लाख २५ हजार कमलेश याला दिले.