भारती शिपयार्डच्या कामगारांच्या तोंडला पाने पुसली, भाजपचे केदार साठे यांचा आरोप
दापोली तालुक्यातील उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या कर्मचार्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
दापोली तालुक्यातील उसगाव येेथे भारती शिपयार्ड ही जहाज बांधणी कंपनी होती. मात्र सदर कंपनी तोट्यात गेल्याने काही वर्षापासून बंद आहे. यामुळे येथील कामगार देशोधडीला लागला आहे. सदर कंपनी स्क्वेअर पोर्ट या कंपनीने ताब्यात घेतली असल्याची चर्चा आहे. शिवाय या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार असल्याने ते विक्रीचा प्रयत्न देखील काही दिवसांपूर्वी या कंपनीने केला होता. मात्र कंपनी कामगारांचे देणे असल्याने याला स्थानिक कामगारांनी विरोध केला.
यानंतर भाजपचे नेते नितेश राणे यांच्या संघटनेने बंद कंपनीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर त्यांच्या संघटनेचा फलक लावला. यानंतर स्थानिक आमदार योगश कदम यांनी देखील यात उडी घेवून बंद असणार्या कंपनीच्या बाहेर कोणतीही कामगार संघटना फलक लावू शकत नाही असे म्हणून याला आक्षेप घेतला.
तसेच आपण सर्व कामगारांना शंभर टक्के देणे मिळून देवू अशी घोषणा केली होती. मात्र आता या कामगारांना नव्या कंपनीने केवळ ४० टक्के देणे देवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप भाजपचे नेते केदार साठे यांनी केला आहे.