बंद बँक खात्याचा धनादेश देऊन ३९ हजाराची फसवणूक केली, गुन्हा दाखल
टायर, ट्यूब व प्लॅप असे ३९ हजार ५०० रुपये किंमतीचे साहित्य खरेदी केल्यानंतर त्या रक्कमेचा धनादेश बंद असलेल्या बँक खात्याचा दिल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी चिपळूण शहरातील रोजी शहरातील बहाद्दूरशेख नाका येथे ओंकार टायर्स दुकानात घडली. यातून ३९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात रविवारी एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिजित अशोक कोलगे (कापसाळ, ता. चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सागर बजरंग जाधव (४६, बहाद्दूरशेख नाका) यांनी दिली आहे.
अभिजित कोलगे याने सागर जाधव याच्या ओंकार टायर्स या दुकानात जावून एमआयएफ कंपनीचे दोन टायर व दोन ट्यूब असे ३९ हजार ५०० रुपये किंमतीचे साहित्य खरेदी केले होते. यावेळी कोलगे याने चिपळुणातील बँकेच्या बंद खात्याचा सही केलेला चेक दिला. त्यातून सागर जाधव यांची ३९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कोलगे याच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.