नीलेश राणेंची नाराजी दूर करण्यात भाजपला यश,राजकारणात कार्यरत राहणार
भाजप नेते निलेश राणे यांनी काल राजकारणात निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं, त्यानंतर आज मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्यामध्ये तब्बल ३ तास चर्चा झाली आहे.त्यानंतर दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले.
देवेंद्र फडणवीस, मंत्री रविंद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यामध्ये तब्बल दिड तास चर्चा झाली. यावेळी नेत्यांनी निलेश राणे यांच्या अडचणी आणि नाराजीचे कारण जाणून घेतले, त्याच्यांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यापुढे देखील राजकारणात असणार आहेत असं सांगितलं आहे. काल निलेश राणे यांनी मी राजकारणातून बाजूला जात असल्याची घोषणा केली होती. राणे यांच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राणे यांच्या स्थानिक पातळीवरील राजकारणात भाजप नेते हस्तक्षेप करत आहेत तसेच दुसऱ्यांना रसद पुरवली जातेय त्यामुळे निलेश राणे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
त्यानंतर आज निलेश राणे यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली आणि त्यांची मनधरणी केली. यानंतर निलेश राणे यांना घेऊन रवींद्र चव्हाण थेट देवेंद्र फडणवीसांकडे पोहोचले. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर निलेश राणे यांची मनधरणी करण्यात भाजप नेत्यांना यश आले आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, “निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत निलेश राणे यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा केली. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही सर्वांची भावना आहे.”आम्ही सर्वजण पक्षासाठी काम करत आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे, इथून पुढे देखील निलेश राणे राजकारणात असतील” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
www.konkantoday.com