राजापूर नगर परिषद प्रशासनाची भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची धडक मोहिम
राजापूर नगर परिषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची धडक मोहिम हाती घेतली आहे. सुमारे चार दिवस चालणार्या या मोहिमेचा शुभारंभ झाला असून मोकाट आणि झुंडीने फिरणार्या या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येत आहे.त्यासाठी सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन, कोल्हापूर या संस्थेचे व्यवस्थापक, दोन तज्ञ डॉक्टरांसह नऊ जणांचे पथक शहरामध्ये कार्यरत आहे. या पथकाने पहिल्या दिवशी सोळा कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण केले आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपीक जितेंद्र जाधव, आरोग्य विभागातील लिपीक प्रसाद महाडीक आदींच्या मार्गदर्शनाखाली भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची मोहिम शहरामध्ये राबविली जात आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून दिलासा मिळणार असून त्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
www.konkantoday.com