राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे आगमन होवून सुमारे अडीच वर्ष होत आली तरीही गंगामाई प्रवाहित
असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे आगमन होवून सुमारे अडीच वर्ष होत आली तरीही अद्याप गंगामाई प्रवाहित आहे. गंगेचा प्रवाह काहीसा कमी झाला असला तरी अद्याप निर्गमन झालेले नाही. भाविकांनी गंगास्नानासाठी गंगाक्षेत्राकडे पाठ फिरवल्याचे दिसत असले तरी पवित्र स्थान म्हणून पाहण्यासाठी आजही पर्यटक गंगाक्षेत्री भेट देत आहेत. गंगामाई वर्षभरापेक्षा जास्त कालावधी प्रवाहित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे
सर्वसाधारणपणे दर ३ वर्षांनी गंगा प्रकट होते व जवळपास ३ महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते, असा प्रघात आहे. मात्र अलिकडच्या कालावधीत तिच्या या आगमन व निर्गमनाच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती. काही वर्षापूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खूपच लांबला होता. यावेळी १ वर्ष १४ दिवसांनी म्हणजेच ३० एप्रिल २०२१ रोजी गंगामाईचे आगमन झाले असून आता ऑक्टोबर २०२३ सुरू झाला तरीही गंगामाई प्रवाहित आहे. मागील काही दिवसांपासून गंगामाईचा प्रवाहही काहीसा कमी झाला असून गायमुखातून वाहणारे पाणी बंद झालेले नाही. अद्यापही गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरलेली आहेत. मात्र या कुंडांच्या पाण्यावर शेवाळीचे साम्राज्य पसरले आहे. www.konkantoday.com